पुरस्कार व सन्मान

गिर्यारोहण व गिरीभ्रमण क्षेत्रात अनेक असे पदर आहेत ज्यामुळे हे क्षेत्र विविध अंगांनी बहरून गेलं आहे.ट्रेकिंग,साहसी क्लाइंबिंग,दुर्गसंवर्धन,रेस्क्यू करणारे, गडकिल्ले स्वच्छता करणारे,झाडे लावणारे, पर्यावरण बाबत जागृतता आणणारे,सोशल मीडियावर जनजागृती करणारे, वाटाडे,असे अनेक व्यक्ती वा समूह याबाबत आपापल्या परीने उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व कार्य बहुतांश कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केले जात आहे.मग अश्या व्यक्ती वा समुहांचा सन्मान केला गेला पाहिजे.त्यांच्या खांद्यावर शाबासकीची थाप पडली गेली पाहिजे.त्यामुळे अश्यांना हुरूप येईलचं पण इतरांना प्रेरणा मिळू शकेल. हाच विचार करून आयोजन समितीने विविध पुरस्कार देऊन अश्या व्यक्ती वा समुहांचा यथोचित सन्मान, सत्कार करण्याचा निर्णय घेतला.


• सह्याद्री रत्न पुरस्कार २०२४.

श्री. आनंद पाळंदे


कै.अविनाश जोशी स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित पहिल्या सह्याद्री मित्र संमेलनात मानाचा पहिला सह्याद्री रत्न पुरस्कार भारतातील नामवंत गिर्यारोहक,लेखक श्री हरिश कपाडिया सर मुंबई यांना देण्यात आला होता.

ह्या वर्षीही त्याचं तोलामोलाच्या व्यक्तीला हा पुरस्कार द्यावा यासाठी निवड समितीने अनेक नावांचा विचार करून सरतेशेवटी श्री आनंद पाळंदे काका यांची एकमताने निवड केली.

'डोंगरयात्रा'कार म्हणून सा-या महाराष्ट्राला परिचीत असलेले हे व्यक्तिमत्त्व.सरकारी बॕकेतील नोकरी सांभाळून पाळंदे काकांनी जी अचाट भटकंती केली त्याला तोड नाही.३०/४० वर्षांपूर्वी जी नाविन्यपूर्ण , माहितीपूर्ण व आडवाटेवरची भटकंती केली ती आजही फारसे कुणी करत नाही.प्रवासाची अपुरे साधने, लिखित स्वरूपात मोजकी पुस्तके, माहिती आणि उपलब्ध नसलेला सोशल मीडिया आणि गुगल.तरी काका जे भटकले ते आजही अचंबित करणारे आहे.

पाळंदे काकांनी भटकंती बरोबर अनेक मासिकात, दैनिकात वा दिवाळी अंकात सलग माहिती पुर्ण लेख लिहित राहिले. मग पुस्तक स्वरूपात ती जगासमोर आली नी नव्या पिढीला त्या पुस्तकांचा, लेखांचा कमालीचा उपयोग झाला.त्यातनं एक दोन पिढ्या निर्माण झाल्या.असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले असले तरी आणि वयानेही सत्तरी पार केली असली तरी त्यांचा उत्साह आणि तरूण पिढीशी संपर्क कौतुकास्पद आहे.तरुणांना मार्गदर्शन करून एक शिक्षित गिर्यारोहक पिढी निर्माण व्हावी यासाठी त्याचा प्रयत्न असतो हे विशेष. या सर्व गुणांचा विचार करून निवड समितीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.


सह्याद्री युवा रत्न..

सह्याद्रीत गिर्यारोहण व गिरीभ्रमण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या तरूणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.हा सन्मान फक्त तरूणांचा देण्यात यावा यासाठी आयोजन समिती ठाम असून ऐन भरात असताना ही पाठिवर शाबासकीची थाप पडायला हवी.हा पुरस्काराचा मूळ हेतू.



रेस्क्यू टीम ऑफ द इयर

गेल्या काही वर्षांत गडकिल्ले वा घाटवाटांच्या परिघात ट्रेकर जमातीचे जाण्याचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढत चालल्याचे आढळते. छंदिष्ठ लोकांबरोबर हवशा - नवशांचे प्रमाणही अधिकाधिक वाढत चालले आहे. त्यामुळे तिथे होणाऱ्या अपघातांची संख्याही वाढत चालली आहे.कठिण ठिकाण होणाऱ्या या अपघातावेळी मदत वा रेस्क्यू करणे तसे फार जिकिरीचे काम.
मग अशा ठिकाणी रेस्क्यू करणार कोण ? सुदैवाने हा प्रश्न ट्रेकर क्षेत्रातील जाणत्या व साहसी भटक्यांनीच सोडवला. मग सह्याद्री मुलूखातील विविध भागात रेस्क्यू वा मदत करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे कुठेही मदत हवी किंवा रेस्क्यू करण्याची वेळ आली की या संस्थांचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन मदतीसाठी धावू लागले. ते ही कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता, हे विशेष!
म्हणून अशा संस्थांना आपण काय मदत करू शकतो? हा विचार पुढे आला. त्या विचारातून रेस्क्यू "टीम ऑफ द इयर" हा रोख रकमेचा पुरस्कार देण्याचे ठरले. त्यातून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही पडेल आणि साधनसामग्री घेण्यास मदतही होईल.



दुर्गसंवर्धन ऑफ द इयर

महाराष्ट्रात एकूण गडकिल्यांची संख्या जवळपास ५०० हून अधिक आहे. त्यात बरेचसे गडकिल्ले उध्वस्त अवस्थेत जीवन कंठित आहेत. तर काही अवशेष स्वरुपात आहेत. शासन त्यांचे पुनर्विकास करण्यासाठी कमी पडत आहे. हे लक्षात आल्यानंतर ट्रेकर जमातीचे काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी आपल्या परीने गडकिल्यांची डागडुजी करायला सुरुवात केली. कालांतराने ते प्रमाण वाढत गेले. मग काही संस्थांचा जन्म झाला. काही गडकिल्ले स्वच्छ व टापटीप दिसू लागले. काही ठिकाणी कातळटाके स्वच्छ करणे, खोदणे, काही ठिकाणी बुरुज, तटबंदी वा इतर अवशेषांची डागडुजी करणे, दरवाजे सुस्थितीत वा नवीन बसविणे, तोफांची स्वच्छता व त्या योग्य ठिकाणी ठेवणे, अशा अनेक प्रकारे कामांचा धडाका सुरू झाला. आज अनेक गडकिल्ल्यांवर याची प्रचिती बघायला मिळते. बरं या संस्था वर्गणी काढून तर कधी स्वखर्चातून अश्या मोहिमा आखतात. स्वत: तिथे कामही करतात.
अशा संस्थांना मदतीचा हात देणे कुठल्याही मराठी माणसाचे कर्तव्य आहे.म्हणून सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पाठीवर शाबासकी व आर्थिक मदतीची सोबत द्यावी, यासाठी हा पुरस्कार देण्याचे ठरले.



सह्याद्रीमित्र ट्रेकर ऑफ द इयर २०२४

१) ' ट्रेकर ऑफ द इयर ' आहे आणि तो दरवर्षी दिला जाणार आहे.तो वार्षिक कामगिरीशी निगडित असेल
२) नेता असावा हा निकष असू नये..
एखादा नेतृत्वही करत असेल तर तो आपोआप उजवा ठरेल.
३) चांगला ट्रेकर हा अभ्यासक, लेखक , छायाचित्रकार असेलच असे नाही.असल्यास अधिक उत्तम.
४) फक्त ट्रेकिंग न करता तो सामाजिक बांधिलकी जपत असेल तर जास्तीचे गुण आपोआप मिळतील.
५) ट्रेकची संख्या, श्रेणी, कालावधी हे निकष मुख्यतः असावेत.
६) चौफेर भटकंती अत्यावश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क नंबर : रत्नाकर भामरे +918805000329



द बेस्ट वाटाड्या ऑफ द इयर

वाटाड्या..
ट्रेकर जमातीचा सह्याद्री कुशीतला खरा सोबती असतो तो तिथला स्थानिक वाटाड्या.ट्रेकर जसा गडकिल्ले व्यतिरिक्त घाटवाटा किंवा अन्य कडेकपारीत भटकू लागला तेंव्हा तिथल्या स्थानिक वाटाड्याचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलं.वाट दाखविण्या बरोबरचं भौगोलिक माहिती देणे,रहाण्याची खाण्याची व्यवस्था करणे, वेळप्रसंगी कुणालाही मदतीला धावून जाणे, अडचणीच्या वेळी कुठेही सहकार्याची भावना ठेवणे.या सर्व गुणांमुळे वाटाड्या हा आता ट्रेकर्स मंडळींचा कौटुंबिक सदस्य झाला.त्यामुळे आम्ही पहिल्याचं वर्षी चांगलं काम करणाऱ्या वाटाड्यांपैकी एकाला या पुरस्कारासाठी निवडणार आहोत.



क्लांईंबर आॕफ द इयर.

सह्याद्रीच्या रांगड्या राकट कातळांवर, गगनभेदी सुळक्यावर जो साहसाची परीसिमा गाठत माथा गाठण्याचं आपलं ध्येय साध्य करतो तो क्लाईंबर अर्थात अरोहक.अश्या धैर्यशील व निधड्या छातीच्या सह्यवीराचा सन्मान करणे आमचं कर्तव्य आहे.ट्रेकर जमातीनंतर सर्वात जास्त सह्याद्रीचा आवडता शिष्य कोण असेल तर तो क्लाईंबर.अनेक अभेद्य सुळके,कातळभिंती लिलया सर करणारा तो साहसी भिडू जिवाची पर्वा न करता तांत्रिक साधनांचा शास्त्रशुद्ध वापर करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने सातत्याने क्लाइंबिंग करतो अश्या जमातीतून एकाची निवड करून त्याला संमेलनात सन्माननीत करण्यात येणार आहे.



क्लाइंबिंग टिम आॕफ द इयर.

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कातळकड्यांचा वेध घेणे एकट्याचं काम नाहींच.मग ५० फुटांची कातळभिंत असो वा ४०० फुटांचा डूक्सनोझ..तिथे लागतो तो संघ.अर्थात साहसी वीरांची टिम.मग तांत्रिक आयुधांची तंत्रशुद्ध मांडणी वा वापर करून माथा गाठणं आणि अश्या धैर्य व साहसी मोहीमा फत्ते करणाऱ्या संघाला या वर्षापासून क्लाइंबिंग टिम आॕफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.नवनवीन सुळके, कातळभिंती वा रूट शोधून ते सातत्यपूर्ण सर करत जाणाऱ्या संघाकडे निवड समितीचे विशेष लक्ष असणारा आहे.त्यात तांत्रिक बाबींचं ज्ञान व शिस्तबद्ध आखणी याकडे विशेष लक्ष असणार आहे.



पर्वतकन्या " हिरकणी" सन्मान पुरस्कार.

हा पुरस्कार खास रणरागिणी अर्थात मुली वा महिलांसाठी असणार आहे.आपल्या महाराष्ट्र संस्कृतीत ७ च्या आत घरात संस्काराचा पगडा असतांना सह्याद्रीच्या रांगड्या राकट भटकंतीचा छंद लागणे आणि तो सातत्यपूर्ण जपून ठेवणे तितकं सोपं नाही.हल्ली तुम्ही कुठल्याही गडकिल्यांवर अथवा घाटवाटांमध्ये जा तिथे भटकणाऱ्या जमातीत मुलींचं प्रमाण कमालीचे वाढलेले दिसेल.अगदी संघ नेतृत्वही करतांना अनेक मुली स्त्रिया दिसतात हि केवढी अभिमानाची गोष्ट आहे.आपला संसार,नोकरी सांभाळून या मुली हा असा साहसी खेळ खेळतात यांच कौतुक आपणा सर्वांना आहेचं.म्हणून त्यांच्यासाठी हा खास पुरस्कार.



शाॕर्टफिल्म आॕफ द इयर

कमीत कमी वेळात एखादा विषय प्रभावीपणे फिल्म माध्यमातून दाखविणे म्हणजे शाॕर्टफिल्म.३ तासांची फिल्म बघण्यात वेळ घालविण्यापेक्षा किमान १५ मिनिटे ते ४५ मिनिटांची फिल्म बनविण्याचा तो एक काळ होता.आता रिल माध्यमातून तो प्रकट होतोय.तरी शाॕर्टफिल्म अधिक प्रभावी बनविण्याचा काळ अजूनही टिकून आहे.म्हणूनचं आयोजन समितीने ह्या वर्षांपासून शाॅर्टफिल्म स्पर्धा घेण्याचे ठरविले. सह्याद्री भोवती अनेक साहसाच्या मोहिमा राबविल्या जातात किंवा ट्रेकिंगचे नितांतसुंदर दर्शन घडविले जाते वा संबंधित विविध विषयांवर एखादा विषय जनसामान्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला जात असतो.अश्या सर्वांगसुंदर फिल्म स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत.त्याचे नियम,अटी वेबसाईटवर उपलब्ध आहेत.


Back to top