गिर्यारोहण व गिरीभ्रमण क्षेत्रात अनेक असे पदर आहेत ज्यामुळे हे क्षेत्र विविध अंगांनी बहरून गेलं आहे. ट्रेकिंग, साहसी क्लाइंबिंग, दुर्गसंवर्धन, रेस्क्यू करणारे, गडकिल्ले स्वच्छता करणारे, झाडे लावणारे, पर्यावरण बाबत जागृतता आणणारे, सोशल मीडियावर जनजागृती करणारे, वाटाडे, असे अनेक व्यक्ती वा समूह याबाबत आपापल्या परीने उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व कार्य बहुतांश कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केले जात आहे. मग अश्या व्यक्ती वा समुहांचा सन्मान केला गेला पाहिजे. त्यांच्या खांद्यावर शाबासकीची थाप पडली गेली पाहिजे. त्यामुळे अश्यांना हुरूप येईलचं पण इतरांना प्रेरणा मिळू शकेल. हाच विचार करून आयोजन समितीने विविध पुरस्कार देऊन अश्या व्यक्ती वा समुहांचा यथोचित सन्मान, सत्कार करण्याचा निर्णय घेतला.
सहयाद्री मित्र संमेलनाचे 5 व 6 जुलै 2025 रोजी तिसरे पर्व साजरे होत आहे. पहिल्या वर्षी श्री. हरिशभाई कपाडिया व दुसऱ्या वर्षी श्री आनंद पाळंदे यांना "सहयाद्री रत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. सह्याद्रीच्या कुशीत दिल्या जाणाऱ्या ह्या सर्वोच्च पुरस्कारासाठी तितक्याच तोला मोलाच्या व्यक्तीची निवड केली जाते. यात त्यांचे या क्षेत्रातील कर्तृत्व, योगदान, प्रेम बघितले जाते . या निकषावर श्री. उमेश झिरपे हे निर्विवाद व आघाडीवरील व्यक्तिमत्व आहे. श्री. उमेश झिरपे यांना प्रेमाने सर्वजण "मामा" नावाने सबोधतात. मामा नावातच सर्व काही येते, जो सर्वाना सोबत घेऊन चालतो, ज्याला कोणताही गर्व शिवत नाही. सर्वांचे मत विचारात घेऊन योग्य निर्णय घेतो. जो सर्वांच्या विश्वासास पात्र ठरतो. गिरीप्रेमी संस्था, पुणे ही संस्था श्री आनंद पाळंदे काका, उषाप्रभा ताई पागे या जेष्ठ धुरीणांनी स्थापन केली. त्या संस्थेला सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्याचे काम उमेश मामा झिरपे यांनी केले आहे. हिमालयातील अवघड अशा अष्टहजारी मोहिमा असतील, अनेक साहसवीरांना घडविण्याचे काम मामांनी केले आहे. नुकताच महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि आत्ता सहयाद्रीतील सर्वोच्च पुरस्कार ही त्यांना जाहीर झाला आहे. त्यांचे "सकाळ" वर्तमान पत्रातील प्रसिद्ध होणारे माऊंटेनरिंग चे अनुभव वाचनीय असतात. ते लेख वाचताना आपण त्या मोहिमेचा भाग कधी होऊन जातो हे कळतच नाही . इतके ते अनुभव जिवंत शब्दबद्ध केलेले असतात. सहयाद्री मित्र पुरस्कार उमेश (मामा) झिरपे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा उचित सन्मान होत आहेच त्यासोबतच या पुरस्काराचीही उंची वाढली आहे. आम्ही सह्य प्रेमी नाशिककर त्यांच्या स्वागतासाठी आतुर झालेलो आहोत.
Read Moreगेल्या काही वर्षांत गडकिल्ले वा घाटवाटांच्या परिघात ट्रेकर जमातीचे जाण्याचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढत चालल्याचे आढळते. छंदिष्ठ लोकांबरोबर हवशा - नवशांचे प्रमाणही अधिकाधिक वाढत चालले आहे. त्यामुळे तिथे होणाऱ्या अपघातांची संख्याही वाढत चालली आहे.कठिण ठिकाण होणाऱ्या या अपघातावेळी मदत वा रेस्क्यू करणे तसे फार जिकिरीचे काम. मग अशा ठिकाणी रेस्क्यू करणार कोण ? सुदैवाने हा प्रश्न ट्रेकर क्षेत्रातील जाणत्या व साहसी भटक्यांनीच सोडवला. मग सह्याद्री मुलूखातील विविध भागात रेस्क्यू वा मदत करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे कुठेही मदत हवी किंवा रेस्क्यू करण्याची वेळ आली की या संस्थांचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन मदतीसाठी धावू लागले. ते ही कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता, हे विशेष! म्हणून अशा संस्थांना आपण काय मदत करू शकतो? हा विचार पुढे आला. त्या विचारातून रेस्क्यू "टीम ऑफ द इयर" हा रोख रकमेचा पुरस्कार देण्याचे ठरले. त्यातून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही पडेल आणि साधनसामग्री घेण्यास मदतही होईल.
Read Moreमहाराष्ट्रात एकूण गडकिल्यांची संख्या जवळपास ५०० हून अधिक आहे. त्यात बरेचसे गडकिल्ले उध्वस्त अवस्थेत जीवन कंठित आहेत. तर काही अवशेष स्वरुपात आहेत. शासन त्यांचे पुनर्विकास करण्यासाठी कमी पडत आहे. हे लक्षात आल्यानंतर ट्रेकर जमातीचे काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी आपल्या परीने गडकिल्यांची डागडुजी करायला सुरुवात केली. कालांतराने ते प्रमाण वाढत गेले. मग काही संस्थांचा जन्म झाला. काही गडकिल्ले स्वच्छ व टापटीप दिसू लागले. काही ठिकाणी कातळटाके स्वच्छ करणे, खोदणे, काही ठिकाणी बुरुज, तटबंदी वा इतर अवशेषांची डागडुजी करणे, दरवाजे सुस्थितीत वा नवीन बसविणे, तोफांची स्वच्छता व त्या योग्य ठिकाणी ठेवणे, अशा अनेक प्रकारे कामांचा धडाका सुरू झाला. आज अनेक गडकिल्ल्यांवर याची प्रचिती बघायला मिळते. बरं या संस्था वर्गणी काढून तर कधी स्वखर्चातून अश्या मोहिमा आखतात. स्वत: तिथे कामही करतात. अशा संस्थांना मदतीचा हात देणे कुठल्याही मराठी माणसाचे कर्तव्य आहे.म्हणून सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पाठीवर शाबासकी व आर्थिक मदतीची सोबत द्यावी, यासाठी हा पुरस्कार देण्याचे ठरले.
Read More
१) 'ट्रेकर ऑफ द इयर' आहे आणि तो दरवर्षी दिला जाणार आहे. तो वार्षिक कामगिरीशी निगडित असेल
२) नेता असावा हा निकष असू नये.. एखादा नेतृत्वही करत असेल तर तो आपोआप उजवा ठरेल.
३) चांगला ट्रेकर हा अभ्यासक, लेखक, छायाचित्रकार असेलच असे नाही. असल्यास अधिक उत्तम.
४) फक्त ट्रेकिंग न करता तो सामाजिक बांधिलकी जपत असेल तर जास्तीचे गुण आपोआप मिळतील.
५) ट्रेकची संख्या, श्रेणी, कालावधी हे निकष मुख्यतः असावेत.
६) चौफेर भटकंती अत्यावश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क नंबर : रत्नाकर भामरे +918805000329
वाटाड्या.. ट्रेकर जमातीचा सह्याद्री कुशीतला खरा सोबती असतो तो तिथला स्थानिक वाटाड्या.ट्रेकर जसा गडकिल्ले व्यतिरिक्त घाटवाटा किंवा अन्य कडेकपारीत भटकू लागला तेंव्हा तिथल्या स्थानिक वाटाड्याचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलं.वाट दाखविण्या बरोबरचं भौगोलिक माहिती देणे,रहाण्याची खाण्याची व्यवस्था करणे, वेळप्रसंगी कुणालाही मदतीला धावून जाणे, अडचणीच्या वेळी कुठेही सहकार्याची भावना ठेवणे.या सर्व गुणांमुळे वाटाड्या हा आता ट्रेकर्स मंडळींचा कौटुंबिक सदस्य झाला.त्यामुळे आम्ही पहिल्याचं वर्षी चांगलं काम करणाऱ्या वाटाड्यांपैकी एकाला या पुरस्कारासाठी निवडणार आहोत.
Read More